( सातारा )
साताऱ्यात सुरू झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा गुरुवारी भव्य आणि उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. संमेलनाच्या निमित्ताने अवघी शाहूनगरी साहित्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. दुपारी शहराच्या राजपथावरून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली असून विविध विषयांवरील आकर्षक चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राजवाड्यापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, प्रा. मिलिंद जोशी, शिवेंद्रराजे भोसले, महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, साताऱ्यातील ९५ शाळांचे विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्याचे पर्यटन, संत साहित्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची शैक्षणिक चळवळ, तसेच संत ज्ञानेश्वर-मुक्ताबाईंच्या संत परंपरेवर आधारित चित्ररथांनी साहित्यिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तकांनी सजलेल्या ग्रंथनगरीत वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना खुला झाला आहे.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारकर साहित्यिकांच्या पाहुणचारासाठी सज्ज असल्याचे सांगत, हे संमेलन साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनीही सातारकरांमधील उत्साहाचे कौतुक करत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यप्रेमींचा प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
दरम्यान, आज (शुक्रवारी) सकाळी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

