(मुंबई)
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या टप्प्यात राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचं आयोजन मंत्रालयात कृषी विभागातर्फे करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्रीमंडळ सदस्य तसेच मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.
ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरवर्षी 6 हजार रुपयांच्या अनुदानात राज्य शासन आणखी 6 हजारांची भर घालते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपयांचे वार्षिक अनुदान मिळते.
एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीसाठीचा सातवा हप्ता वितरित झाल्यानंतर योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. आतापर्यंत सहा हप्त्यांमधून 93 लाख 9 हजार शेतकऱ्यांना 11 हजार 130 कोटी रुपयांचे थेट वाटप करण्यात आले आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की, “ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, उत्पादन खर्च भागवण्यासाठी आणि शेती टिकवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. थेट आर्थिक सहाय्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

