(नागपूर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना अद्यापही योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी धक्कादायक माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यासाठी एकूण ५,९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) चे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, २०१७ च्या शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्येच दिला होता. तरीदेखील ६.५६ लाख शेतकऱ्यांना अद्याप लाभ वितरित करण्यात आलेला नाही, याची कबुली त्यांनी दिली.
शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण दूर करून शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सरकारने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी उच्चाधिकार समिती गठीत केली आहे. ही समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी कार्यरत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

