(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रुग्णसेवेत मोठी उडी घेतली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत जवळपास दुप्पट झाली असून, त्याचा ताण कमी करण्यासाठी लवकरच विविध पदांवरील कंत्राटी भरती केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी २०२१-२२ या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात ८९,८११ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली आणि २०२४-२५ मध्ये ही संख्या तब्बल २,०२,६७७ वर पोहोचली. याच कालावधीत मोठ्या शस्त्रक्रियांची संख्याही ९८३ वरून २,५९२ पर्यंत गेली आहे. एक्स-रे, तपासण्या, श्वानदंश व सर्पदंशाच्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे.
दरम्यान, परकार हॉस्पिटलमधील डॉ. अलिमियाँ परकार आणि डॉ. मतीन परकार यांच्याशी चर्चा होऊन येथील १२ एम.डी. आणि एम.एस. डॉक्टर्स शासकीय रुग्णालयात सेवा देतील, अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर १५० सुरक्षारक्षक, २०० परिचारिका, १० क्लार्क यासह विविध पदांची कंत्राटी भरती पुढील ८ ते १५ दिवसांत केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, रत्नागिरीतील चंपक मैदानावर उभारण्यात येणाऱ्या नव्या शासकीय रुग्णालयासाठी ४२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच नव्या इमारतीचे काम सुरू होणार आहे. या भरतीमुळे रत्नागिरीकरांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

