(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिरकरवाडा बंदरात रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत ‘अमीना आयशा’ ही मासेमारी नौका समुद्राच्या प्रचंड लाटेमुळे उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील आठ जण पाण्यात फेकले गेले. त्यापैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले असून, दोन खलाशी बेपत्ता झाले होते. सोमवारी दुपारी त्यापैकी एकाचा मृतदेह समुद्रातून सापडला, तर दुसरा अजूनही बेपत्ता आहे. या घटनेमुळे मच्छीमार समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्घटनाग्रस्त ‘अमीना आयशा’ (पाट्याची बोट, नं. आयएनडी एमएच 04 एमएम 6043) ही शब्बीर अलिसाहब मजगांवकर, रा. रत्नागिरी यांची मालकीची आहे. रविवारी दुपारी 4.30 वाजता ही नौका पावस-वायंगणी दिशेने मासेमारीसाठी निघाली होती. त्यावर मालक शब्बीर मजगांवकर, अब्दुल रशिद अलिसाहेब मजगांवकर (35, मिरकरवाडा), फैज अब्दुलमजिद बुडीये (39, कर्ला), इम्तीयाज मिरकर (37, राजिवडा), विनोद हिरू धुरी (48, मांडवी), रबिजोल इस्लाम चौधरी (21, आसाम), जियाउद्दीन लष्कर (20, आसाम) आणि इनामुद्दीन हसन (24, आसाम) असे आठजण होते.
सायंकाळी सातच्या सुमारास नौका परतत असताना भगवती किल्ल्याजवळील ब्रेकवॉटर टोकावर अचानक उसळलेल्या प्रचंड लाटेने नौकेचा तोल गेला आणि ती उलटली. बोटीवरील सर्वांनी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. त्यावेळी जवळील एका मासेमारी नौकेने शब्बीर मजगांवकर, अब्दुल मजगांवकर, फैज बुडीये, इम्तीयाज मिरकर, रबिजोल आणि जियाउद्दीन यांना वाचवले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, विनोद धुरी आणि इनामुद्दीन हसन हे दोघे बेपत्ता राहिले. सोमवारी सकाळपासून त्यांचा शोध सुरू असताना दुपारी पांढरा समुद्र येथे विनोद धुरी याचा मृतदेह आढळला. इनामुद्दीन हसनचा शोध मात्र अद्याप सुरू आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. मात्र खवळलेल्या समुद्रामुळे बचावकार्याला अडथळे येत आहेत. या घटनेमुळे मासेमारी हंगामाच्या प्रारंभीच मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, समुद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

