(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ढोल-ताशांच्या गजरात आणि बँजोच्या जल्लोषात रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील गणेशोत्सवाला सोमवारी मंगलमय निरोप देण्यात आला. पोलीस दलाच्या सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीला उत्साहाची विशेष झळाळी लाभली.
मुख्यालयात दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचे पूजन-अर्चन करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपारिकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. बँजोच्या तालावर थिरकणाऱ्यांत अनेकजण गुलाबी व पांढऱ्या रंगाचे कुर्ते परिधान करून सहभागी झाले होते. त्यांच्या उत्साहाने मिरवणुकीला झगमगाट प्राप्त झाला.
तर महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. भक्तिभावाने सजलेल्या या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. ढोल-ताशांचा गजर, बँजोचा जल्लोषात, “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिस्त, उत्साह आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या विसर्जन मिरवणुकीत अनुभवायला मिळाला. अखेर जल्लोषात आणि श्रद्धेच्या वातावरणात श्रींना निरोप देण्यात आला.

