(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शहरातील जो. के. फाईल येथील मुख्य सीएनजी पंपाच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. वाहनचालकांची वाढती गैरसोय आणि इंधनटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक आशिष प्रसाद यांना पंप तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच विलंब केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी या सीएनजी पंपावर घडलेल्या गंभीर प्रकारानंतर पंपाचे कामकाज बंद करण्यात आले होते. काही अज्ञात व्यक्तींनी पंपावरील कर्मचारी आणि व्यवस्थापकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली होती. इतकेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार घडला होता. या घटनेमुळे घाबरलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव काम सोडल्याने पंपाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले.
या पार्श्वभूमीवर पंप व्यवस्थापक रोशन भोईर यांनी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी १२ मेपासून पंप तात्पुरता बंद ठेवत असल्याची माहिती प्रशासनाला दिली होती. मात्र, तब्बल सहा दिवस उलटूनही पंप सुरू न झाल्याने प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने रत्नागिरी पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून संबंधित पंपाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनालाही पंप परिसरात कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध भागांत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनचालकांचा सीएनजीकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला जे. के. फाईल येथील पंप हा रत्नागिरीतील प्रमुख सीएनजी पुरवठा केंद्र मानला जातो. विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहनांसाठी या पंपाचे महत्त्व अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पंप लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरत असून, आता महानगर गॅस प्रशासन नेमका काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

