(रत्नागिरी)
रत्नागिरी मजगाव येथील सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक एजाज महमूद इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या कथित मनमानी व अन्यायकारक कारभाराविरोधात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एजाज इब्जी यांचे बंधू शरीफहसन इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला होता. अर्जातील काही त्रुटींच्या कारणावरून तो निकाली काढण्यात आला. मात्र या प्रक्रियेदरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने एजाज इब्जी यांच्यावर चुकीचे आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे.
समितीने दिलेल्या नोटीसमध्ये उर्दू शाळांमध्ये जात नमूद करण्याची पद्धत नसल्याचा उल्लेख करत, एजाज इब्जी शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या मुलांच्या शालेय नोंदींमध्ये जात नमूद केली, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्यांची कन्या आयशा एजाज इब्जी हिला देण्यात आलेले वैध जातपडताळणी प्रमाणपत्रही संशयास्पद ठरवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या आरोपांबाबत एजाज इब्जी यांनी जातपडताळणी कार्यालयाकडे तक्रार दाखल करून खुलासा मागितला. माहिती अधिकारांतर्गत माहितीची मागणी तसेच अपीलही करण्यात आले. मात्र संबंधित कार्यालयाकडे आरोपांना पुष्टी देणारी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तरीही कार्यालयाकडून न्यायासाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणतीही वैयक्तिक चूक नसताना आणि प्रशासकीय त्रुटींमुळे अन्याय झाल्यास सामान्य नागरिकाने न्यायालयात का जावे, असा सवाल उपस्थित करत एजाज इब्जी यांनी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयास लेखी कळविले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून उपोषण न करण्याची विनंती करण्यात आली असली तरी ठोस लेखी निर्णय किंवा दिलासा न मिळाल्याने आपण उपोषणावर ठाम असल्याचे एजाज महमूद इब्जी यांनी स्पष्ट केले आहे.

