(रत्नागिरी)
दिव्यांगांसाठी पेट्रोलपंप डिलरशिप मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीची अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून डिलरशिप मंजूर झाल्याचे सांगत विविध शुल्कांच्या नावाखाली ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरात घडली. याबाबत मनोहर शंकर मेलगे (रा. गवंडेवाडी, खानू-पाली, सध्या संदिप लक्ष्मण सावंत यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास, मूळ रा. बेळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलगे यांनी दिव्यांगांसाठी पेट्रोलपंप डिलरशिपविषयी माहिती मिळविण्यासाठी गुगलवर शोध घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी दोन अनोळखी व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क साधून स्वतःला बीपीसीएल, मुंबईचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तसेच त्यांची पेट्रोलपंप डिलरशिप मंजूर झाल्याचा दावा केला.
यानंतर संशयितांनी डिलरशिप लायसन्स, एनओसी, इनव्हॉइस, पेट्रोल फ्युएल टँक आणि इतर प्रक्रियांसाठी विविध शुल्क भरण्याचे कारण देत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत एकूण ६ लाख ३३ हजार ५०० रुपये भरले.
रक्कम भरल्यानंतरही पेट्रोलपंपाचे काम सुरू न झाल्याने मेलगे यांनी संबंधित मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही क्रमांक बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी बीपीसीएलच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधला असता, कंपनीकडून असा कोणताही व्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञात मोबाईलधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

