(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पुन्हा एकदा गंभीर त्रुटी समोर आल्याने कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणेश कॉलनी परिसरात महामार्गालगत नुकतीच उभारलेली संरक्षक काँक्रीट भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत असल्याचे दृश्य सोमवारी पाहायला मिळाले. पूर्णत्वास गेलेले काम पुन्हा का तोडावे लागत आहे, याबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘ग्रामीण वार्ता’ने घटनास्थळी पाहणी केली असता, संबंधित कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने संरक्षक भिंत आवश्यकतेपेक्षा अधिक उंच झाल्याने ती निर्धारित उंचीपर्यंत कमी करण्यासाठी तोडण्यात येत असल्याची माहिती दिली. मात्र, महामार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण होऊन अनेक दिवस उलटल्यानंतर, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कामाची पाहणी केल्यानंतरही ही त्रुटी आता कशी लक्षात आली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मंत्री स्तरावरून महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी आश्वासने सातत्याने दिली जात असताना प्रत्यक्षात तयार झालेले काम पुन्हा पाडण्याची वेळ येत असल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या नियोजनावर आणि कामाच्या दर्जावर संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात अशा प्रकारच्या चुका म्हणजे निधीचा अपव्यय असल्याची टीकाही स्थानिकांनी केली. महामार्गाचे अनेक टप्पे अद्याप अपूर्ण आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कामाची प्रभावी आणि सातत्यपूर्ण देखरेख होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारी क्वचितच प्रत्यक्ष पाहणीसाठी येत असल्याने कंत्राटदारावर आवश्यक नियंत्रण राहत नसल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी या मार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, संरक्षक भिंत पाडण्याच्या कामामुळे आता पुन्हा एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांची वर्दळ एकाच लेनवरून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण झाल्याची चिंता वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच मिऱ्या–नागपूर महामार्गाचे कामही वर्षानुवर्षे रखडू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामातील त्रुटींची सखोल चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी आणि हा महामार्ग दर्जेदार, सुरक्षित व नियोजित कालावधीत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहतूकदारांकडून होत आहे.

