(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असताना रत्नागिरी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ७ मधील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
प्रभाग क्रमांक ७ मधील शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत शालेय गणवेश, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक साहित्याचे वितरण करण्यात आल्याने या उपक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येत असून, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तो अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला.
यावेळी बोलताना निलेश आखाडे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंत्योदयाचा विचार आम्हाला प्रेरणा देणारा आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
या उपक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, पदाधिकारी विक्रम जैन, शहर सरचिटणीस व नगरसेवक संदीप सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक ७ मधील दानशूर नागरिकांनी आर्थिक सहकार्य केले.
साहित्य वितरण कार्यक्रमाला शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, सरचिटणीस संदीप सुर्वे, विक्रम जैन, भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सोनाली केसरकर, निधी आखाडे, प्रज्ञा टाकळे, अजिंक्य केसरकर, जितेंद्र जाधव, तेजस पवार, पूजा पवार, नितीन गांगण, नरेंद्र रानडे, सचिन गांधी, राजेंद्र फाळके यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर, फळ वाटप, वह्यांचे वितरण तसेच ग्रामदेवतेकडे प्रार्थना अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमातून “शिक्षण हेच सर्वोत्तम दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जात आहे.

