(देवळे / प्रकाश चाळके)
कोकणातील गौरी-गणपती उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण रंगत आणणाऱ्या शक्ती-तुरा (जाखडी) शाहिरी परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामचंद्र हरि घाणेकर (बुवा) यांचे आज मंगळवार (२१ जुलै) त्यांच्या मूळ गावी पढवण येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शक्ती-तुऱ्याच्या परंपरेतील एक प्रभावी आवाज कायमचा हरपल्याची भावना कला क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्य आणि शक्ती-तुरा शाहिरीला राज्यासह देशभरात ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या दमदार आणि पहाडी आवाजाने शक्ती-तुऱ्याच्या कार्यक्रमांना वेगळीच उंची मिळाली होती. कॅसेटच्या माध्यमातून ही लोककला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच देश-विदेशातील कोकणवासीयांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील ‘पहिले कॅसेट किंग’ म्हणूनही ओळखले जात होते.
दशकानुदशके त्यांनी शक्ती-तुऱ्याच्या शाहिरी परंपरेचे जतन आणि संवर्धन केले. त्यांच्या गायकीने आणि सादरीकरणाच्या अनोख्या शैलीने असंख्य रसिकांना भुरळ घातली. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन करून या लोककलेचा वारसा पुढे नेण्याचे कार्यही केले.
त्यांच्या निधनाने शक्ती-तुरा आणि जाखडी कला क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना कलाकार, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे. “शक्ती-तुऱ्याचा पहाडी आवाज आज कायमचा शांत झाला,” अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शाहीर रामचंद्र घाणेकर (बुवा) यांच्यावर आज (२१ जुलै) दुपारी २ वाजता पढवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

