(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, वरवडे भाग (खंडाळा) येथील मराठी विषयाचे शिक्षक एस. के. जाधव यांच्या निर्मितीतील ‘निसर्ग’ या लघुपटाला नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्या १५ लघुपटांमध्ये स्थान मिळवत सहाव्या क्रमांकाचे नामांकन प्राप्त झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शुक्रवारी (दि. २६ जून) कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये निर्माता, लेखक एस. के. जाधव आणि त्यांच्या संपूर्ण कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार, अनिल म्हमाने, आरपीआयचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन कलाकारांचा गौरव करण्यात आला.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी देशभरातून ८६० हून अधिक लघुपट प्राप्त झाले होते. त्यापैकी आशय, विषय आणि सादरीकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे निवडलेल्या पहिल्या १५ लघुपटांमध्ये ‘निसर्ग’ या लघुपटाने सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले.
एस. के. जाधव हे शिक्षक असण्याबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि समाजप्रबोधनाची आवड जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक विषयांवर आधारित लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी विविध कार्यक्रमांत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करावी, यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला आहे. आपल्या शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणत त्यांनी ‘दोस्तीची दुनिया’ आणि ‘निसर्ग’ हे दोन लघुपट तयार केले. यापूर्वी युवासेना, मुंबई आयोजित युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या लघुपटाद्वारेही त्यांनी सहभाग नोंदवला होता.
‘निसर्ग’ या लघुपटात एस. के. जाधव यांच्यासह विनू मेस्त्री, सुमित कांबळे, साहिल मोहिते, पंकज जाधव, अतुल सावंत, विशाल येलये, संदीप कनावजे, पार्थ माने, पौर्णिमा कीर आणि श्रद्धा सावंत यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर विवेक जाधव आणि जयेश जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे एस. के. जाधव आणि त्यांच्या संपूर्ण कलाकारांच्या चमूवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून खंडाळा, वरवडे आणि परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

