(नवी दिल्ली)
तुम्ही आतापर्यंत मृत किंवा ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानाच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अवयवदानामुळे अनेकांना नवं आयुष्य मिळतं. मात्र, एम्समध्ये यंदा पहिल्यांदाच गर्भदान झालं आहे. ३२ वर्षीय वंदना जैन यांचा पाचव्या महिन्यात दुर्दैवी गर्भपात झाला. या कठीण प्रसंगानंतरही त्यांच्या कुटुंबीयांनी दु:ख बाजूला ठेवून संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी गर्भदान करण्याचा निर्णय घेतला.
वंदना जैन यांच्या कुटुंबाने सकाळी एम्सच्या देहदान समितीशी संपर्क साधला. समितीचे उपाध्यक्ष सुधीर गुप्ता आणि समन्वयक जी.पी. तायल यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.बी. राय आणि त्यांच्या टीमशी चर्चा करून आवश्यक कागदपत्रे व औपचारिकता पूर्ण केल्या. अखेर संध्याकाळी ७ वाजता एम्सला पहिले गर्भदान प्राप्त झाले.
गर्भदानाचा उपयोग काय?
- एम्सच्या शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सुब्रत बसू यांनी सांगितले की, भ्रूण अभ्यास हा वैद्यकीय संशोधन आणि अध्यापनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
- मानवी विकास समजून घेण्यासाठी आधार: भ्रूणातील विविध अवयव आणि ऊती वेगवेगळ्या काळात कशा विकसित होतात, हे अभ्यासता येते.
- शिक्षणासाठी मदत: वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची वाढ समजण्यास प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
- वैज्ञानिक संशोधनात योगदान: उदाहरणार्थ, बाळ जन्माला येताना त्याची मज्जासंस्था पूर्ण विकसित नसते; ती पुढील दोन वर्षांत हळूहळू वाढते. अशा बदलांचा अभ्यास भविष्यातील उपचारपद्धतींसाठी महत्त्वाचा ठरतो.
- वृद्धत्व समजून घेण्यास मदत: गर्भातील ऊती सातत्याने वाढत असतात, तर वृद्धापकाळात त्यांचे नुकसान होऊ लागते. या प्रक्रियेची तुलना करून वृद्धत्वावर अधिक सखोल संशोधन करता येते.

