(नवी दिल्ली)
देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात लक्षणीय वाढ साध्य करण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाच्या योजना आणि कोळंबी उत्पादकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मांडणी केली.
या बैठकीत एसपीएफ (Specific Pathogen Free) कोळंबी ब्रूडस्टॉक, पीपीएल (Post Larvae) आणि जिवंत खाद्य आयात प्रक्रियेशी संबंधित कायदेशीर व तांत्रिक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. कोळंबी उत्पादनात शाश्वत वाढ साध्य करताना जैवसुरक्षेचे कठोर निकष पाळणे, आयात प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि देशातील मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपायांवर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांचीही उपस्थिती होती. यासोबतच मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयसीएआर संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, एमपीईडीए आणि सीएएचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोळंबी शेती, हॅचरी, मत्स्य खाद्य आणि निर्यात क्षेत्रातील विविध भागधारकांनीही आपली मते मांडत मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी सहकार्याची गरज अधोरेखित केली.
या बैठकीतून कोळंबी उत्पादन वाढ, निर्यात क्षमता बळकट करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर समन्वयाने काम करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

