(नाशिक)
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाला ‘पितृपक्ष’ म्हटलं जातं. श्रद्धा आणि परंपरेनुसार या पंधरवड्यात दिवंगत पूर्वज वायुरूपाने पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून अन्न-जलाची अपेक्षा करतात. त्यांना श्राद्ध व तर्पण विधीद्वारे अन्न व जल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते, अशी मान्यता आहे.
पितृपक्ष म्हणजे काय?
गणरायाला निरोप दिल्यानंतर घराघरात पितृपक्षाची तयारी सुरू होते. यंदा भाद्रपद शुक्ल पौर्णिमेनंतर, रविवारीपासून पितृपक्षास सुरुवात झाली असून महालयारंभ प्रतिपदा ही पहिली श्राद्धतिथी आहे. हिंदू धर्मानुसार या पंधरा दिवसांत कुटुंबातील दिवंगत पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म, तर्पण आणि दान केले जाते. कावळा, गाय आणि श्वान यांना अन्नदान करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, यांद्वारे पितरांपर्यंत अन्न पोहोचते आणि ते समाधानी होतात. ज्यांच्या मृत्यूतिथीची माहिती नसते, त्यांच्यासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले जाते.
काय करावे पितृपक्षात?
- या काळात पूर्वजांच्या इच्छेनुसार दानपुण्य करणे अत्यंत फलदायी ठरते, असे मानले जाते.
- गाईला दान करणे
- तूप, चांदी, पैसा, फळे, मीठ, काळे तीळ, कपडे आणि गूळ यांचे दान तिथीनुसार केलेले हे दान पितरांच्या आशीर्वादासाठी उपयुक्त मानले जाते.
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे पितृपंधरवड्यात भाविकांची मोठी गर्दी होते. श्राद्धविधीसाठी हा काळ विशेष पवित्र मानला जात असल्याने हॉटेल बुकिंग, पूजा साहित्य, वाहतूक व भोजन व्यवस्थेत कोट्यवधींची उलाढाल होते. साधारणतः ५०० रुपयांना मिळणाऱ्या खोलीचे भाडे या काळात १५०० ते २००० रुपये इतके वाढले आहे.
यंदा पितृपक्ष ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत आहे. तर अंतिम दिवशी म्हणजे २१ सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या आहे.

