(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षण व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाला गती देताना केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘अपार’ (APAAR – Automated Permanent Academic Account Registry) आयडी तयार करणे अनिवार्य करण्यात आले असून, हा आयडी नसल्यास भविष्यात प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कागदपत्रांच्या पडताळणीसंदर्भात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना १२ अंकी स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक प्रदान करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची नोंद एका एकात्मिक डिजिटल व्यवस्थेत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ‘अपार’ आयडी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा कायमस्वरूपी डिजिटल शैक्षणिक ओळख क्रमांक असणार आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रगती तसेच विविध शैक्षणिक उपलब्धींची माहिती एकाच व्यासपीठावर सुरक्षितरीत्या जतन केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक माहितीचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे.
‘अपार’ आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि डिजीलॉकर खाते जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रांचे डिजिटल संग्रहण शक्य होणार असून, देशातील कोणत्याही भागात शिक्षण किंवा नोकरीसाठी अर्ज करताना आवश्यक प्रमाणपत्रे सहज उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते परीक्षा नोंदणी, शिष्यवृत्ती योजना आणि उच्च शिक्षणातील विविध टप्प्यांपर्यंत ‘अपार’ आयडीचा वापर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा आयडी वेळेत तयार करून घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठांना तातडीचे निर्देश
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांचे ‘अपार’ आयडी तयार करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश व शैक्षणिक नोंदींच्या दृष्टीने या आयडीचे वाढते महत्त्व लक्षात घेता, विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून व्यापक स्तरावर जनजागृती आणि नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.

