( चिपळूण / वार्ताहर )
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, मुंबई विद्यापीठ संलग्न डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच डॉ. तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान सोहळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे होते. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा संस्थेच्या संचालिका सौ. अंजलीताई चोरगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात पदवीदान मिरवणुकीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, वंदे मातरम्, विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. प्रारंभी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. यानंतर वरिष्ठ महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालयातील एकूण ९१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तानाजीराव चोरगे यांनी विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता, आधुनिक शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व यावर विचार मांडले. ज्ञानाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी व्हावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या पदवीदान सोहळ्यास संस्थेचे संचालक मंडळ, सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सृष्टी कदम यांनी केले, तर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

