(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील रहिवासी तथा शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका सौ. आश्विनी अनिल लिंगायत या ३० वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि यशस्वी सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान दिले.
आश्विनी लिंगायत यांनी वाघापूर, आंबा आणि बांबवडे यांसारख्या दुर्गम व ग्रामीण भागांत अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली. आरोग्य सेवा देताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे आजही ग्रामीण भागात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कुटुंबापासून दूर राहून त्यांनी कोविड प्रतिबंध, जनजागृती आणि रुग्णसेवा यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या या धाडसी व समर्पित कार्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांचा गौरव केला.
रुग्णांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि मायेने सेवा करणे, हा त्यांच्या कार्याचा विशेष ठसा राहिला आहे. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आरोग्य विभागातील सहकारी, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान आणि सेवाभाव आगामी पिढीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

