(चिपळूण)
गणेशोत्सवाच्या उत्साहात गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील पाणेकरवाडी येथे ४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता ते ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी सुशील तानाजी धाणेकर (वय ३१, मूळचे घाटकोपर, मुंबई) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धाणेकर हे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासह गावी आले होते. त्यांनी सोबत आणलेले १५ तोळे ५ ग्रॅम ४०० मिली वजनाचे, सुमारे ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका बॉक्समध्ये ठेवून लोखंडी कपाटातील काळ्या पिशवीत सुरक्षित केले होते.
मात्र, धाणेकर कुटुंब घरात असतानाच, अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असल्याची संधी साधली. रात्रीच्या वेळी घरात शिरून त्याने थेट कपाटातील पिशवी उचलली आणि सर्व दागिने लंपास केले. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तातडीने त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तक्रार नोंदवली. चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

