(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रिक्षा बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथे घडली. या हल्ल्यात विनोद आंग्रे यांच्यासह त्यांच्या आई, पत्नी आणि मुलीवरही मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास घडली.
विनोद प्रमोद आंग्रे (वय ५०, रा. तेलीवाडी, चांदेराई) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते चांदेराई बाजारातून घरी परत येत असताना समीर सुरेश आंब्रे याने आपली रिक्षा रस्त्यात आडवी लावली होती. आंग्रे यांनी हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली.
या आवाजाने विनोद आंग्रे यांची आई द्रोपदी घराबाहेर आल्या. त्यांनी विचारणा केली असता, जुन्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून समीर आंब्रे याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. आईला सोडवण्यासाठी विनोद पुढे सरसावले असता आरोपी अमित सुरेश आंब्रे याने हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. यात त्यांच्या डोळ्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली. खाली पडल्याने डोक्यालाही मार लागला. घटनेदरम्यान विनोद आंग्रे यांची पत्नी व मुलगी भांडण सोडविण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रकरणाची माहिती मिळताच विनोद यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी समीर सुरेश आंब्रे, अमित सुरेश आंब्रे यांच्यासह तिसऱ्या आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम ११८(२), ३५२, ३५१(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

