(चिपळूण / वार्ताहर)
गोळ्यांची पावडर आणि अन्य काही औषधी द्रव्याचे सेवन केल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात घडली. शनिवारी (१५ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास महिलेने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
वृषाली जगन्नाथ दैवज्ञ (३०, सध्या रा. खंड गणपती मंदिराजवळ, चिपळूण; मूळ रा. सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली यांना १२ ऑगस्ट रोजी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. वालावलकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी वृषाली यांनी काही पदार्थ सेवन केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. नेमके कोणते औषधी द्रव्य अथवा पदार्थ सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडली, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास हाती घेतला आहे.

