(मुंबई / वृत्तसंस्था)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थखात्याची जबाबदारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थसंकल्पीय कामकाज विधिमंडळात सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे असलेले अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते. त्यांच्या निधनाला जवळपास नऊ महिने पूर्ण झाले असले, तरी अद्याप हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत देण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्थखाते पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर २५ ऑक्टोबर रोजी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत अर्थखात्याच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती भुजबळ यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
भुजबळ म्हणाले की, महायुतीची स्थापना होताना झालेल्या ठरावानुसार अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असायला हवे. पक्षाच्या आमदारांचीही हीच भूमिका असून, ती रास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अर्थखाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटपाबाबत निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थखात्याच्या हस्तांतरणाबाबत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय आहे, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, दिल्लीतील नेत्यांनी या विषयावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपापल्या स्तरावर निर्णय घ्यावेत, त्याबाबत दिल्लीतील नेत्यांची कोणतीही हरकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.
भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत देण्याबाबत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची आडकाठी नसल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थखाते स्वतःकडेच ठेवू इच्छित आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या खातेवाटपाबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


