(नाशिक / वृत्तसंस्था)
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदातीरावर ५१७ जणांनी एकाच वेळी शंखनाद करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला. कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवमामलेदार पटांगणाजवळ आयोजित या उपक्रमात अमेरिकेतील ३०३ व्यक्तींच्या सामूहिक शंखनादाचा यापूर्वीचा विक्रम मोडण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी नव्या विश्वविक्रमाची घोषणा करताच ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने गोदावरीचा परिसर दुमदुमून गेला. भारतीय धार्मिक परंपरेतील शंखनादाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या या उपक्रमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलारंभाची आध्यात्मिक नांदी करण्यात आली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथक यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे झालेल्या या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीमुळे परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमात साधू-महंत, शंखवादक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी निर्धारित निकषांनुसार विक्रमाची पडताळणी करण्यात आल्याची माहिती दिली. एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शंखनाद करण्याचा यापूर्वीचा विक्रम ३०३ जणांचा होता. हा विक्रम मोडण्यासाठी त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकाच वेळी शंखनाद करणे आवश्यक होते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित निकषांनुसार केलेल्या कामगिरीची दोन निरीक्षकांकडून पडताळणी करण्यात आली.
शंखनादासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये समन्वय साधून एकाच वेळी शंखनाद घडवून आणणे हे या उपक्रमातील महत्त्वाचे आव्हान होते. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक प्रयत्नांतून ही कामगिरी साध्य केली.
या वेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंतविजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सामूहिक शंखनादातून नोंदवलेल्या या विक्रमाबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहभागींचे अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे. अशा उपक्रमांमधून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. धार्मिक विधी, मंगलकार्य आणि आध्यात्मिक उपासनेत शंखनादाला विशेष महत्त्व असून, या प्राचीन परंपरेला विश्वविक्रमाची जोड देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही शंखनाद उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष स्थान आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ५१७ जणांनी एकत्रित शंखनाद करून विश्वविक्रम नोंदवणे हा नाशिकसाठी विशेष क्षण आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी याच उपक्रमातील २५१ शंखवादक शंखनाद करणार आहेत. त्यामुळे या प्राचीन परंपरेला सिंहस्थाच्या मंगलारंभाशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, २०१५ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साडेतीन कोटी भाविक सहभागी झाले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात १२ कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. मागील कुंभमेळ्यात विकासकामांसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर यंदा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून नाशिकचा विकास होऊन शहराचे नाव देशाच्या पटलावर येईल, असे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. नाशिक येथील रामकुंडावर हा कार्यक्रम होणार असून, त्र्यंबकेश्वर येथेही त्याच वेळी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता गोदावरीच्या तीरावर साडेसहा हजार आदिवासी बांधव गोदा आरती करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी किंवा पोलिसांचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा सोहळा आहे, असे सांगत पालकमंत्री महाजन यांनी नागरिकांना तयारीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले जाते, त्याच भावनेने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा सन्मान करावा, असे ते म्हणाले.
कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असल्याने रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक, निवास, भोजन आणि भाविकांना मार्गदर्शन यांचे नियोजन महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडून विविध पायाभूत सुविधा उभारण्याची कामे सुरू असून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भाविकांना योग्य माहिती मिळावी, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि नाशिकमधील वास्तव्य सुखकर व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिकची स्वच्छता, सुंदरता आणि नागरिकांचे प्रेमळ आदरातिथ्य भाविकांच्या स्मरणात राहणे हीच या सोहळ्याच्या यशाची खरी कसोटी असेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आज (सोमवार, २६ ऑक्टोबर) रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, संत-महंतांशी संवाद, आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिधावाटप, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा आणि शहरातील महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ असे विविध कार्यक्रम नियोजित आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे सकाळी ९.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेणार असून, त्यानंतर श्री चंद्र लॉन्स येथे संत-महंतांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १२ वाजता हरसूल येथील महानुभाव दत्त मंदिर, दलपतपूर रोड येथे शिवसेनेच्या वतीने आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिधावाटप करण्यात येणार आहे.
दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळी परिस्थिती आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून, कुंभमेळ्याच्या नियोजनासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या समांतर गंगापूर रोडच्या कामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता होणार आहे. कॅनॉल रोड परिसरातील तिरुमला हाइट्स, पाइपलाइन रोड, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे गंगापूर रोड परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
सायंकाळी ४ वाजता गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये कर्मवीर अॅड. बाबुराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्यात पायाभूत सुविधांचा विकास, सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी, दुष्काळग्रस्तांना मदत आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार या विषयांवर भर देण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.


