(पुणे / वृत्तसंस्था)
भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा राजगड पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत मुंबई, पुणे, दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल येथील एकूण १३ तरुणींची सुटका करण्यात आली. ही कारवाई २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात वैभव बालाजी इंगळे याला अटक करण्यात आली असून, कथित सेक्स रॅकेटचा सूत्रधार रघु शेट्टी फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमराई रिसॉर्टमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रघु शेट्टी हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचा आरोप आहे. या महिलांकडून अवघ्या एक हजार रुपयांच्या मोबदल्यात हा व्यवसाय करून घेतला जात असल्याचे छाप्यादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले.
संबंधित रिसॉर्टमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली आणि त्यानंतर छापा टाकला. या कारवाईत १३ तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. सुटका करण्यात आलेल्या तरुणी वेगवेगळ्या राज्यांतील असल्याने या प्रकरणाची व्याप्ती तपासण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
या घटनेनंतर आमराई रिसॉर्टच्या मालकी आणि व्यवस्थापनाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. हे रिसॉर्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत असून, संबंधित पदाधिकाऱ्याने ते दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिल्याचे समजते. मात्र, रिसॉर्ट नेमके कोणाच्या मालकीचे आहे, याबाबत पोलिसांनी समांतर तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून रिसॉर्टमधील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. सुटका करण्यात आलेल्या १३ तरुणींना या व्यवसायात कशा प्रकारे आणण्यात आले, त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवण्यात आले आणि या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. फरार आरोपी रघु शेट्टीचा शोध घेण्यासोबतच या संपूर्ण प्रकरणामागील यंत्रणेची माहिती मिळवण्यासाठीही तपास सुरू आहे.


