( मुंबई / वार्ताहर )
राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणे आणि तापमानात वाढ होणे यामुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ सर्वसामान्य नागरिकांवरच नव्हे, तर पक्ष्यांवरही होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता, निर्जलीकरण, उष्माघात आणि अन्नटंचाई अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर पाणी आणि अन्न उपलब्ध न झाल्यास काही पक्ष्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीत, गॅलरीत किंवा गच्चीवर पाणी आणि धान्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत नैसर्गिक जलस्रोत आटणे आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची उपलब्धता कमी होणे, यामुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागू शकते. अशा परिस्थितीत घरांच्या परिसरात पाण्याची व्यवस्था केल्यास पक्ष्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर पाण्याचे भांडे ठेवावे. मात्र, ते भांडे थेट उन्हात राहून त्यातील पाणी तापणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी दररोज बदलून भांडे स्वच्छ धुवावे, जेणेकरून त्यामध्ये शेवाळ, जिवाणू आणि डासांची उत्पत्ती होण्याचा धोका कमी होईल. शक्य असल्यास पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठीही व्यवस्था करावी, असे पक्षीप्रेमी निलेश मोरे यांनी सांगितले.
पाण्यासोबतच पक्ष्यांना पुरेसे अन्न मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात पक्ष्यांसाठी सहज उपलब्ध होणारे हलके धान्य ठेवण्याचा सल्ला पक्षीप्रेमीनी दिला आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ सकाळी व संध्याकाळी पक्ष्यांसाठी ठेवाव्यात. यामुळे त्यांना आवश्यक अन्न मिळण्यास मदत होईल. योग्य वेळी पाणी आणि अन्न उपलब्ध न झाल्यास पक्ष्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिकांनी घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर पाण्याची वाटी ठेवणं गरजेचं आहे. तसेच अशा परिस्थितीमुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होण्याची भीतीही आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत पक्षीप्रेमीनी व्यक्त केले आहे.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही केवळ पर्यावरणप्रेमींची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घेण्याची गरज असल्याचे पक्षीप्रेमींनी नमूद केले. घराच्या परिसरात पाण्याची वाटी ठेवल्यामुळे तहानलेल्या पक्ष्यांना पाणी मिळू शकते. त्याचबरोबर नियमितपणे पाणी बदलणे आणि भांडे स्वच्छ ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. पक्ष्यांसाठी धान्य ठेवताना सकाळी आणि संध्याकाळी त्याची व्यवस्था केल्यास त्यांना अन्न मिळण्यास मदत होईल. पाणी, अन्न आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे..”
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पाणी, धान्य आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी नियमित प्रयत्न करावेत, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे. घराच्या बाल्कनीत, गॅलरीत किंवा गच्चीवर पाण्याचे स्वच्छ भांडे ठेवणे, त्यात दररोज ताजे पाणी भरणे, पक्ष्यांसाठी धान्य उपलब्ध करून देणे आणि शक्य असल्यास कृत्रिम घरटी लावणे, अशा छोट्या उपायांमधून पक्ष्यांना उन्हाळ्यात आधार मिळू शकतो. वाढत्या उष्णतेच्या काळात पक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


