(रत्नागिरी / प्रतिनिधी)
‘बंदीच्या काळात सावित्री नदीत बार्जेस आल्याच कशा?’ असा जाहीर सवाल उपस्थित करत या प्रकरणाकडे सर्वप्रथम लक्ष वेधणारे वृत्त रत्नागिरी 24 News ने प्रसिद्ध केले होते. अतिवृष्टीचा इशारा असतानाही नदीपात्रात बार्जेस उभ्या ठेवण्यामागील जबाबदारी, प्रशासनाची भूमिका आणि सुरक्षेतील निष्काळजीपणाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना अखेर अधिकृत कारवाईची जोड मिळाली आहे. सावित्री नदीतील तीन बार्जेस पुराच्या प्रवाहात वाहून जाऊन म्हाप्रळ–आंबेत पुलावर आदळल्याच्या गंभीर प्रकरणी बार्ज मालकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रशाद अहमद मुजावर (रा. बांद्रा, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या बार्ज मालकाचे नाव असून, भारतीय न्याय संहिता तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ६ जुलै रोजी पहाटे घडलेल्या या घटनेत सावित्री नदीपात्रातील सापे (ता. महाड) येथील सर्व्हे क्रमांक ३९/२ परिसरात नांगरून ठेवण्यात आलेल्या ‘एमव्ही अल सुभानी’, ‘एमव्ही दुलदुल’ आणि ‘एमव्ही झोया’ या तीन बार्जेस पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा स्पष्ट इशारा दिला असतानाही बार्जेस सुरक्षित ठिकाणी हलविणे, अतिरिक्त नांगर टाकणे किंवा दोरखंडांची मजबुती तपासणे यांसारख्या मूलभूत सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
पुराच्या तीव्र प्रवाहामुळे बार्जेसचे नांगर आणि दोरखंड तुटल्याने त्या अनियंत्रितपणे वाहून गेल्या. त्यापैकी ‘एमव्ही अल सुभानी’ ही बार्ज पुलाखालून पुढे जाऊन खाडीकिनारी अडकली, तर ‘एमव्ही दुलदुल’ आणि ‘एमव्ही झोया’ या दोन बार्जेस थेट म्हाप्रळ–आंबेत पुलावर आदळल्या. या धडकेमुळे पुलाच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले असून, त्या वेळी पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पंचनामा करून चौकशी सुरू केली. कार्यकारी अभियंता आणि माणगाव उपविभागीय अभियंत्यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगावकर यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, बंदीच्या कालावधीत नदीपात्रात बार्जेस का आणि कशा ठेवण्यात आल्या, संबंधित परवानग्या होत्या का, तसेच प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप का केला नाही, या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर म्हाप्रळ–आंबेत पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला असून, पुलाच्या संरचनात्मक स्थैर्याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

