(चिपळूण)
तांबी–तांबडवाडी–रावळगाव–निर्वाळ–खरवते या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तसेच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू होता.
या मागणीसाठी श्री. प्रकाशराव जाधव, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. मोहन जाधव तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सातत्याने शिवसेना नेते व माजी मंत्री, आमदार भास्करराव जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत आमदार भास्करराव जाधव यांनी नुकत्याच सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्यासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला आहे.
या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या निधी मंजुरीबद्दल शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक श्री. शशिकांत चव्हाण यांनी आमदार भास्करराव जाधव यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे.

