(रत्नागिरी)
मिरकरवाडा येथील मासेमारी नौका समुद्रात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भगवती बंदर किनाऱ्यालगत ही दुर्घटना घडली. या बोटीवर आठ खलाशी असल्याची माहिती असून, त्यापैकी सहा जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, दोन खलाशी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
नौका बुडाल्याची जाणीव होताच खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. तब्बल एक तास पोहत किनारा गाठण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान, स्थानिक मासेमारी नौकेवरील खलाशांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी सहा खलाशांना सुरक्षितरित्या बोटीवर घेतले. परंतु दोन खलाशी खोल समुद्रात बेपत्ता झाले.
घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक मासेमारी नौका, किनारी सुरक्षा पथक तसेच बंदर विभागाचे कर्मचारी हरवलेल्या खलाशांचा शोध घेत आहेत. अंधारामुळे अडथळे येत असले तरी, बचाव कार्याला वेग देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे मिरकरवाडा आणि भगवती बंदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रात वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

