( मुंबई )
आजी-नातवामधील भावनिक बंध जरी घट्ट असला, तरी त्यावरून आजीला मुलाचा ताबा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला. पाच वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आई-वडिलांकडे देण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने दिले.
काय आहे प्रकरण
७४ वर्षीय वृद्ध महिलेला जुळे नातू आहेत. त्यापैकी एकाला सेरेब्रल पाल्सी असल्याने वृद्ध महिलेचा मुलगा आणि सुनेने दुसऱ्या नातवाची काळजी घेण्याची जबाबदारी सुरुवातीला आजीकडे सोपवली होती. काही वर्षे आजीने नातवाची काळजी घेतली. मात्र, मालमत्तेवरून मुलगा आणि आई यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर मुलाने नातवाचा ताबा परत मिळवण्याची मागणी केली, पण आजीने नकार दिला. या वादावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आजीने दावा केला की, ती जन्मापासून नातवाची काळजी घेत असून त्यांच्यात भावनिक नाते आहे. त्यामुळे मुलाचा ताबा तिलाच द्यावा. मात्र न्यायालयाने तिचा दावा फेटाळला.
न्यायालयाचे स्पष्ट मत
- अल्पवयीन मुलांच्या ताब्याचा निर्णय घेताना मुलाचे कल्याण हा सर्वोच्च निकष असतो.
- मुलाचे आई-वडील हेच नैसर्गिक व कायदेशीर पालक असल्यामुळे त्यांना ताब्याचा स्पष्ट अधिकार आहे.
- फक्त आजी-नातवामधील प्रेमाच्या नात्यामुळे पालकांना ताब्यापासून वंचित करता येणार नाही.
- पालकांचा ताबा नाकारला जाऊ शकतो, तेव्हाच जेव्हा तो मुलाच्या हिताला प्रतिकूल ठरेल.
- या प्रकरणात पालकांमध्ये वैवाहिक वाद नाही, वडील सरकारी सेवेत असून पालक मुलाची काळजी घेऊ शकतात, हेही सिद्ध झाले आहे.
न्यायालयाने वृद्धेला दोन आठवड्यांत नातवाचा ताबा आई-वडिलांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. तसेच, मुलाला आईला नियमित भेटता यावे यासाठी विशेष परवानगीही दिली.

