( गुहागर / वार्ताहर )
पारंपरिक शेतीपासून दूर जात रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असताना, कोकणातील पारंपरिक आणि आरोग्यदायी शेतीपद्धतीला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न गुहागर तालुक्यातील उमराठ गावात सुरू आहे. गावातील १७ एकर सलग क्षेत्रावर सेंद्रिय खतांचा वापर करून सामूहिक नाचणी शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग ‘असाध्य शेतकरी गटा’मार्फत करण्यात आला आहे.
नाचणी ही कोकणातील पारंपरिक आणि पौष्टिक पिकांपैकी एक. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे नाचणी शेतीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर उमराठ येथील शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नातून नाचणी शेतीला नवसंजीवनी देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे, उत्पादित नाचणीपासून लहान मुलांसाठी नाचणी सत्व, पापड, लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्याबरोबरच मधुमेहींसाठीही आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देण्याचा या गटाचा मानस आहे.
११ शेतकऱ्यांनी एकत्र येत उभारला गट
गुहागर पंचायत समितीच्या वेळणेश्वर गणाचे सदस्य संदीप गोरिवले यांच्या सक्रिय प्रेरणेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यातून ११ इच्छुक शेतकऱ्यांचा ‘असाध्य शेतकरी गट’ स्थापन करण्यात आला. या गटात निमंत्रक प्रशांत कदम, महेश गोरिवले आणि सुरज घाडे यांच्यासह संदीप गोरिवले, भिकू मालप, संतोष धनावडे, बाबाजी गावणंग, महेश घाडे, संदीप गावणंग, नारायण गावणंग आणि नितीन गावणंग यांचा समावेश आहे.
एप्रिलपासूनच तयारीला सुरुवात
या सामूहिक शेती उपक्रमासाठी १७ एकर सलग क्षेत्राची एप्रिल महिन्यातच साफसफाई आणि मशागत करण्यात आली. त्यानंतर रोपवाटिका तयार करून जूनमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाचणी बियाण्याची पेरणी करण्यात आली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरणी तसेच खुरपणी करून जमीन तणमुक्त करण्यात आली. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर सेंद्रिय पद्धतीला प्राधान्य देण्यात आले.
४५ सहकाऱ्यांच्या श्रमदानातून १० दिवसांत लागवड
जुलै महिन्यात नाचणी लागवडीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. गावातील महिला बचतगट तसेच इतर शेतकरी अशा सुमारे ४५ सहकाऱ्यांनी श्रमदानातून या उपक्रमात सहभाग घेतला. जवळपास १० दिवस उत्साहपूर्ण वातावरणात नाचणीची लागवड करण्यात आली.
लागवडीदरम्यान पारंपरिक ‘भल्लरी’ गीतांच्या साथीने श्रमदानाचा उत्साह वाढविण्यात आला. त्यामुळे सामूहिक शेतीचा हा उपक्रम केवळ कृषी प्रयोग न राहता गावातील सामाजिक एकोपा, श्रमसंस्कृती आणि पारंपरिक लोककलेचे दर्शन घडविणारा ठरला. लागवड पूर्ण झाल्यानंतर आनंदगीतांच्या माध्यमातून या टप्प्याचा उत्साहात समारोप करण्यात आला.
पारंपरिक शेतीला आधुनिक दृष्टिकोनाची जोड
एकीकडे तरुण पिढी रोजगार आणि व्यवसायाच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित होत असताना अनेक ठिकाणी शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी वडिलोपार्जित जमिनी पडून राहण्याचे किंवा विकल्या जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत तरुण आणि शेतकरी वर्गाने शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहावे, सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे आणि पारंपरिक पिकांचे संवर्धन करावे, हा संदेश उमराठमधील या उपक्रमातून मिळत आहे.
सेंद्रिय शेतीतून आरोग्य आणि रोजगाराची संधी
नाचणी हे पौष्टिक तृणधान्य असल्याने त्याला सध्या आरोग्याच्या दृष्टीने मोठी मागणी आहे. उमराठमधील या उपक्रमातून केवळ नाचणी उत्पादन वाढविणे हा उद्देश नसून, त्यावर प्रक्रिया करून नाचणी सत्व, पापड, लाडू यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतमालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच गावातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
या उपक्रमाला पंचायत समिती गुहागर कृषी विभाग, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि संपूर्ण टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच ग्रामपंचायत उमराठनेही सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे.
पारंपरिक नाचणी पिकाचे संवर्धन, सेंद्रिय शेतीचा प्रसार, सामूहिक श्रमसंस्कृती आणि स्थानिक पातळीवर कृषी उत्पादनाला मूल्यवर्धन देण्याचा प्रयत्न यामुळे उमराठमधील १७ एकरांवरील हा उपक्रम कोकणातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.

