(मुंबई)
शहरातील व्यस्त जीवनशैली, करिअरची स्पर्धा आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक तरुण दांपत्यांसाठी दैनंदिन घरकाम सांभाळणे कठीण ठरत आहे. अशाच परिस्थितीत मुंबईतील आयआयटी पदवीधर जोडप्याने घेतलेला निर्णय आता चर्चेचा विषय ठरला आहे.
आयआयटी बॉम्बे पदवीधर अमन गोयल आणि आयआयटी कानपूर पदवीधर त्यांची पत्नी हर्षिता श्रीवास्तव यांनी त्यांच्या घरगुती कामांसाठी प्रोफेशनल होम मॅनेजर नियुक्त केला आहे. या व्यवस्थेमुळे त्यांना घरकामांमधील तणाव कमी झाला असून, वृद्ध पालकांनाही मोठा आधार मिळाला आहे.
हा होम मॅनेजर पूर्वी एका नामांकित हॉटेल चेनमध्ये ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत होता आणि आता सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत घराचे संपूर्ण व्यवस्थापन पाहतो. त्यामध्ये जेवणाची आखणी, घरकामांचे नियोजन, कपडे धुणे, देखभाल, कामांचे वाटप यांसह सर्व जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत.
अमन गोयल यांनी सांगितले, “मला माझ्या पालकांवर ओझं टाकायचं नाही. त्यांना त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यावा, प्रवास करावा आणि आरामात राहावं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. या होम मॅनेजरला दरमहा १ लाख रुपये पगार दिला जातो. ही रक्कम जरी जास्त वाटली, तरी आमच्या वेळेची खरी किंमत तितकीच आहे.”
अमन-हर्षिताला योग्य होम मॅनेजर विशेष प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सापडला. वाढत्या शहरी जीवनशैलीत अशा व्यावसायिक घरकाम सेवाची मागणी वाढत आहे. हे जोडपं दाखवते की आधुनिक पिढी आपल्या वेळेची आणि जीवनशैलीची किंमत ओळखत आहे. भविष्यात प्रोफेशनल होम मॅनेजर ही अनेक घरांची नियमित सुविधा बनण्याची शक्यता आहे.

