(पालघर)
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनिष्ठ नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे 27 वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा पालघर जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश गावाच्या हद्दीत हा अपघात घडला असून, या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा अपघात सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता दुर्वेश गावातील हेरिटेज डेअरीसमोर झाला. फॉर्च्यूनर कार आणि हायवा ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र 23 वर्षीय प्रणय प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाला आहे.
लेन बदलताना भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पाटील आणि त्यांचा मित्र प्रणय चौधरी हे दोघे फॉर्च्यूनर कार (क्रमांक BR 05 PB 5055) मधून गुजरातच्या दिशेने जात होते. दुर्वेश गावाच्या हद्दीत कार चालकाने भरधाव वेगात दुसऱ्या लेनमधून पहिल्या लेनमध्ये जाताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाला.
रुग्णालयात मृत घोषित
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत संभाजी पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, तो त्यांच्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंडे करत आहेत.
क्रीडा क्षेत्रात शोक
संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रासह देशाच्या क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि संघटनांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

