(रत्नागिरी / जिमाका)
शेती उत्पादन वाढविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमालाची गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरील कृषी पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही राज्य पुरस्कृत योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीनमधील कृषी अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे.
या दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे शासनाकडून अनुदान मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जागतिक कृषी तंत्रज्ञानाचा मिळणार अनुभव
जगभरातील शेती क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती तसेच शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना मिळावा, हा या अभ्यास दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५ शेतकऱ्यांचा कोटा
या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुढीलप्रमाणे आरक्षण राहणार आहे :
- १ महिला शेतकरी
- १ केंद्र किंवा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी
- ३ इतर शेतकरी
लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर सोडत पद्धतीने (लॉटरीद्वारे) लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय परदेश दौऱ्यासाठी निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. तसेच अर्जदार कोणत्याही शासकीय, निमशासकीय किंवा खासगी संस्थेत नोकरी करणारा नसावा. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा अभियंता या व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पासपोर्ट असणे बंधनकारक
अर्जदाराकडे अर्जाच्या वेळी किमान एक वर्ष वैध मुदत असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच AgriStack अंतर्गत Farmer ID असणेही बंधनकारक आहे.
एका शेतकरी कुटुंबातील, म्हणजेच पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुले, यापैकी केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबातील अन्य सदस्याला स्वखर्चानेही या दौऱ्यावर सोबत नेण्यास परवानगी राहणार नाही.
यापूर्वी कोणत्याही शासकीय विभागाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा. लाभार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असून, निवडीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र तसेच कोरोना तपासणी अहवाल सादर करावा लागणार आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांनी अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे :
- गेल्या सहा महिन्यांतील चालू ७/१२ आणि ८-अ उतारा
- आधार कार्ड आणि रेशन कार्डची छायांकित प्रत
- वैध पासपोर्टची छायांकित प्रत
- डॉक्टरांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र
१७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत.
युरोप आणि चीनमधील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही संधी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, जिल्ह्यातील पात्र शेतकरी बंधू-भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

