(संगमेश्वर /प्रतिनिधी)
बावनदी (रेवाळेवाडी) येथील जुन्या पुलावरून नदीत पडून बेपत्ता झालेल्या महेश नारायण भरणकर (वय ४२) यांचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी पुलापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. चार दिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेचा सोमवारी दुर्दैवी शेवट झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी महेश भरणकर हे बावनदीच्या जुन्या पुलावर बसले असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते नदीत कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. नदीचा प्रवाह, पाण्याची खोली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी सलग चार दिवस नदीपात्र व परिसरात व्यापक शोधमोहीम राबविली. या संयुक्त प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी पुलापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर नदीपात्रात महेश भरणकर यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी ताब्यात घेतला. या दुर्दैवी घटनेने बावनदी परिसरावर शोककळा पसरली असून, महेश भरणकर यांच्या अकाली निधनाबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. चार दिवस आशेवर सुरू असलेली शोधमोहीम अखेर दुःखद वास्तवाने संपुष्टात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

