(पुणे)
गणेशोत्सव विसर्जनाच्या तयारीत पुणे शहर रंगलेले असतानाच शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या गँगवॉरमुळे दहशतीखाली आले. नाना पेठ परिसरात झालेल्या या गँगवॉरमध्ये २० वर्षीय आयुष कोमकरची पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांचा धक्कादायक खुलासा
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून वनराज आंदेकरचे वडील व आयुषचा आजोबा बंडू आंदेकर आणि त्याच्या नातेवाईकांनी आखलेल्या कटाचा भाग आहे. गुन्हे शाखेला आंदेकर टोळी “बदला घेण्याचा कट” रचत असल्याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. त्या आधारावर आठ जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र, कटात नातवाला बळी दिला जाईल, याची कल्पना नव्हती. सध्या या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.
काय घडलं नेमकं?
१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळीबार आणि कोयत्याच्या वारातून खून करण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ जणांना अटक झाली होती.
वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुषची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष दुचाकीवरून नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर गाडी उभी करत असताना आरोपी अमन खान आणि यश पाटील हे दबा धरून बसले होते. त्यांनी आयुषवर गोळीबार करून जागीच ठार मारले. आयुष कोमकर हा 20 वर्षांचा असून महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं.
या प्रकरणी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ‘वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला. अमन पठाण आणि यश पाटील याने आयुषवर गोळीबार केला. त्यावेळी अमित पाटोळे व सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते. गोळीबारानंतर ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे म्हणत आरोपींनी दहशत माजविली. घटनास्थळी १२ काडतुसे आणि एक अर्धवट काडतूस सापडले असून, मृतदेहामध्ये नऊ काडतुसे आढळली आहेत. तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केला.
अॅड. प्रशांत पवार व अॅड. मिथुन चव्हाण यांनी आरोपींची बाजू मांडली. आंदेकर व कोमकर कुटुंबात दिवाणी स्वरूपाचे वाद असून, वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अटक आरोपींचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांच्या न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

