( मुंबई )
दहिसर शांतीनगर येथील एसआरएच्या २४ मजली इमारतीला रविवारी दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
आग वेगाने पसरताच रहिवाशांमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या दलाने धाडसपूर्ण कारवाई करत ३६ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सायंकाळी सव्वा सहा वाजता अखेर आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती बीएमसीच्या अग्निशमन विभागाने दिली.
मृत आणि जखमींची स्थिती
- उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.
- एका अपंग मुलीची प्रकृती गंभीर असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
- दुसऱ्या रुग्णालयात दाखल १० जखमींपैकी एका ४ वर्षीय मुलाची स्थिती चिंताजनक आहे.
- आणखी दोन रुग्णालयांत दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या आगीस शॉर्ट सर्किट कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

