(मुंबई / रामदास धो. गमरे)
बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) गुहागर पतसंस्थेच्या वतीने गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित रहिवासीयांचा मेळावा संस्थेचे चेअरमन के. सी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर मेळाव्याचा प्रारंभी चेअरमन के. सी. जाधव यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. तद्नंतर चेअरमन के. सी. जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमास सुरवात केली. वाक्कुशल संजय तांबे यांनी स्पष्ट, सुंदर आणि प्रभावशाली शैलीने अत्यंत लाघवी पध्दतीने सूत्रसंचालन करून सर्वांचे मन वेधून घेतले. तालुका संघाचे चेअरमन तसेच पतसंस्थेचे संचालक दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करताना गेल्या चार वर्षात पतसंस्थेच्या कामकाजाची मुहूर्तमेढ करण्यापासून त्याच्या आजवरच्या जडणघडणीचा प्रवास, त्यावेळी उदभवलेल्या समस्या त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी केलेले परिश्रम, मेहनत यावर प्रकाश टाकत पतसंस्थेचे उद्घाटन झाल्यापासून आजवर पतसंस्थेचे सभासद, ठेवी वाढण्यासाठी कोणते कोणते उपक्रम राबविले व पतसंस्था गतिमान केली यासंदर्भातील आढावा घेतला.
सुरवातीच्या काळात काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता न झाल्याने पतसंस्था केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने ग्रामीण भागतीलच सभासदांनाच घ्यावे लागले. परंतु आता सर्वच तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून पतसंस्था आता मान्यताप्राप्त झाल्यामुळे गुहागर तालुक्यातील नोकरीधंद्यामुळे मुंबईस्थित रहिवास्यांनाही गावचा रहिवासी दाखला किंवा तत्सम कोणताही पुरावा उपलब्ध करून दिल्यास सभासद करून घेण्यात येणार आहे, तसेच पतसंस्थेच्या उन्नतीसाठी काही सूचना, उपाययोजना असल्यास त्यांचाही आढावा घेण्यासाठी आपण हा मेळाव्याचे आयोजन केले आहे असे नमूद केले.
पतसंस्थेचे तज्ञ संचालक शांतिदुत जाधव यांनी अनेक पतसंस्था, त्यांची घटना, कार्यपद्धती, आलेख, सभासदांचा अभिप्राय याचा अभ्यास करून योजना कश्या असाव्यात यासंदर्भात तक्ता बनवून आपण इतर पतसंस्थेपेक्षा कमी व्याजदरात तारण देऊन पतसंस्था व ठेवीदार यांना जास्तीतजास्त नफा देऊन दोघांचाही उत्कर्ष कसा होईल व सभासद पट कसा वाढेल यावर सुनियोजित नियोजन करून त्याची मुद्देसूद माहिती दिली.
तज्ञ संचालक शैलेंद्र पवार यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात पतसंस्था निर्माण करतेवेळी जे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले ते संचालक वर्षभराचे आहेत तरी नवीन येणारे संचालक हे सभासदांमधून येतील आणि कामकाज पुढे नेतील तसेच इतर पतसंस्थेपेक्षा आपला व्याजदर कमी असल्याने आपली पतसंस्था सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारी आहे. त्यामुळे सर्वांनी त्यात सहभागी होऊन एकत्रितरित्या सर्वांचा उत्कर्ष होण्यासाठी पुढे या, असे मार्गदर्शनपर आवाहन केले.
सोबतच सुभाष मोहिते, शशिकांत मोहिते, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अरुण गमरे, अप्पा सावंत, पवार, न्यायदान कमिटीचे सचिव कदम, कैलास मोहिते, दीपक सावंत आदी सभासदांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत संचालक मंडळाने ७४ वर्षानंतर का होईना परंतु आपल्या बौद्धबांधवांच्या हक्काची पतसंस्था निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले व छोटेसे रोपटे लावून भविष्यात त्याचा वटवृक्ष होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाऊल उचलले याबद्दल त्यांचे कोडकौतुक केले.
शशिकांत मोहिते यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात “ही पतसंस्था निर्माण होण्यासाठी गाव व मुंबई संचालक मंडळाचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याचा मी साक्षीदार आहे अनेक संकटांना तोंड देत त्यांनी ही पतसंस्था निर्माण करून तालुका संघाला सहकार क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आणि वेळप्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी हक्काची पतसंस्था निर्माण केली त्याबद्दल संचालक मंडळाचे मी आभार मानतो तसेच सर्व सभासदांनी आपली इतर पतसंस्था, बँका यातील खाती आपल्या पतसंस्थेत उघडावी, आपल्या शाखेतील, विभागातील, भावकितील, मित्रपरिवारातील स्वकियांना पतसंस्थेचे सभासद बनवून घ्यावे” असे नमूद केले.
संचालक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी शुभेच्छापर भाषण देताना “मागासवर्गीय कोट्यातून आपण पतसंस्था घेतल्याने जास्तीतजास्त सभासद हे आपले असतील व त्याचे फायदे आपण आपल्या बौद्ध बांधवांना मिळवुन देऊ व गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित राहिवासीयांना ही जास्तीतजास्त प्रमाणात सभासद बनवून घेऊ व पतसंस्था गतिमान करण्यास कटिबद्ध होऊ” असे नमूद केले.
सरतेशेवटी दीपक मोहिते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित उपस्थित रहिवासीयांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.