रेल्वे प्रवासात डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरट्याने पळवली; गुन्हा दाखल
( रत्नागिरी )
रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून चोरट्याने तब्बल १५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना ३ डिसेंबर रोजी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेमध्ये घडली. याप्रकरणी शून्य नंबरने गुरुवारी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नारायण रामराव सरदेसाई (वय ६१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २ डिसेंबर २०२४ रोजी नारायण सरदेसाई पत्नीसह मंगलूर एक्स्प्रेसने मुंबई ते भटकळ (कर्नाटक) असा प्रवास करत होते. ही रेल्वे खेडजवळ आली असता सरदेसाई दाम्पत्य झोपले होते. ही गाडी ३ रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आली असता नारायण सरदेसाई यांच्या पत्नीला जाग आली. त्यावेळी डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या पर्समध्ये ४ लाख किमतीचे हिऱ्याचे कानातले जोड, हिऱ्याचे २ लाखांचे मंगळसूत्र, ६० हजारांचे हिऱ्याचे छोटे मंगळसूत्र, हिऱ्याची ५० हजारांची नाकातील चमकी, १ लाखाची हिऱ्याची अंगठी, इतर बांगड्या, मोहन माळ, अंगठी आणि ३० हजाराचे दोन मोबाइल असा एकूण १५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिस अधिक तपास करत आहेत.