(नवी दिल्ली)
होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील युद्धजन्य तणावाचा गंभीर परिणाम समोर आला आहे. ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युद्धामुळे वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा जीव गेला असल्याची माहिती समोर आली आहे. कॅप्टन सिंह यांचे कुटुंब रांची येथील अर्गोरा परिसरात राहत असून ते मूळचे नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अवाना’ जहाज तेल घेण्यासाठी होर्मुझ परिसरात गेले होते. तेल भरल्यानंतर १ मार्च रोजी जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले. मात्र, दुबई पासून सुमारे ६० किमी अंतरावर युद्धजन्य परिस्थितीमुळे जहाजाला समुद्रातच लंगर टाकावा लागला. तब्बल १८ दिवस जहाज समुद्रात अडकून होते. या जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी होते, ज्यांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
वैद्यकीय मदत मिळाली नाही
१८ मार्च २०२६ रोजी कॅप्टन राकेश रंजन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी तातडीने दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्र, युद्धाच्या पार्श्वभूमीवर एटीसीकडून मदत नाकारण्यात आली. यानंतर त्यांना बोटीच्या मदतीने दुबई किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, या प्रक्रियेत मोठा विलंब झाल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
कॅप्टन सिंह गेल्या २ फेब्रुवारी रोजी सुट्टी संपवून पुन्हा जहाजावर रुजू झाले होते. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
१८ दिवस समुद्रात अडकले कर्मचारी
‘अवाना’ जहाजावरील सुमारे ३५ कर्मचारी गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकून होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना मूलभूत सुविधा आणि वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय संघर्षाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर कसा होतो, याचे गंभीर उदाहरण समोर आले आहे. भविष्यात अशा परिस्थितीत आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी यंत्रणा उभी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

