(पुणे)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची कन्या अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. आपल्या मेहनतीने आणि यशाने तिने खेड तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले होते. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि तिचे अकाली निधन झाले.
२८ ऑगस्टच्या पहाटे अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले. पाणी किती तापले आहे का, हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली असता हिटरने विजेचा धक्का बसला आणि उकळते पाणी अंगावर सांडले. या भीषण अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली होती. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान अखेर तिचे निधन झाले.
अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याने तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी आर्थिक सहाय्यही दिले. तरीसुद्धा सर्व प्रयत्नांना अखेर यश आले नाही. जिल्हाधिकारी होण्याचे मोठे स्वप्न अश्विनीने बाळगले होते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत ती दिवस-रात्र मेहनत घेत होती. परंतु दुर्दैवाने तिचे ते स्वप्न अपूर्णच राहिले. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हा आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी वर्ग शोकाकुल झाला आहे.

