(मुंबई)
राज्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी दिलासा देणारी महाडायलिसीस योजना महाराष्ट्र दिनी (1 मे) अधिक विस्तारली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते 12 नवीन डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सध्या राज्यात 92 केंद्रे कार्यरत असून 558 डायलिसीस बेड्स उपलब्ध आहेत, तर नव्या केंद्रांमुळे ही संख्या 104 वर जाणार आहे.
ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून रुग्णांना घराजवळच मोफत उपचार मिळावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये किमान 5 बेड्स तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये 8 ते 10 डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील खर्चिक उपचारांचा ताण कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार सेवा मिळत आहे.
नवीन केंद्रांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड, चंद्रपूरमधील मूल, यवतमाळमधील दारव्हा, बीडमधील केज, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील रावेर, सोलापूरमधील मंगळवेढा, साताऱ्यातील ढेबेवाडी, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला, गडचिरोलीतील कुरखेडा, रत्नागिरीतील दापोली आणि ठाण्यातील बदलापूर या ठिकाणांचा समावेश आहे. या केंद्रांमुळे दुर्गम भागातील रुग्णांनाही उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.
‘महाडायलिसीस’ योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध आहेत. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.
ही योजना पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून रुग्णांना ऑनलाइन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे आणि सेवा अधिक पारदर्शक झाली आहे. केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसीस तंत्रज्ञ, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून नेफ्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जातात. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन करण्यात येते.
रुग्णांना डायलिसीससोबतच रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन्स आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला या सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत HLL Lifecare Limited मार्फत राबवली जात असून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे.
एकूणच, ‘महाडायलिसीस’ योजनेच्या विस्तारामुळे राज्यातील हजारो किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

