(मुंबई / रामदास गमरे)
मुसळधार पावसामुळे आणि निसर्गातील बदलांमुळे भिक्खूंना बाहेर फिरणे शक्य नसते म्हणून पावसाळ्यातील तीन महिने (आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत) बौद्ध भिक्खूंनी एकाच ठिकाणी वास्तव्य करून त्या काळात विहार किंवा तत्सम ठिकाणी राहून ध्यान, चिंतन आणि धम्म-उपदेश करत समाजात धम्मजागृती निर्माण करावी असा आदेश बुद्धांनी दिला, भिक्खूंना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची व समाजात प्रवचनाच्या माध्यमातून धम्मजागृती, धम्मप्रचार, प्रसार करण्याची संधी मिळण्यासाठी वर्षावासाची सुरूवात करण्यात आली.
बुद्धांच्या याच आदेशाला अनुसरून बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती विनोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन पौर्णिमा गुरुवार दि. १० जुलै २०२५ ते प्रवरणा पौर्णिमा सोमवार दि. ६ ऑक्टोबर २०२५ या काळात वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन प्रत्येक आठवड्यात विहित दिवशी सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत बौद्धजन पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व भारतीय बौद्ध बांधवांनी, उपासक, उपासिकांनी सदर प्रवचन मालिकेस उपस्थित राहून धम्मप्रचार, प्रसाराच्या कार्यास हातभार लावला असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.