(मुंबई)
राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात लवचिकता आणण्यासाठी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ‘कारखाने अधिनियम 1948’ आणि ‘दुकाने तसेच आस्थापना अधिनियम 2017’ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, कारखान्यातील दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 तासांपर्यंत वाढवले जाणार आहेत, तर दुकाने आणि आस्थापनांतील कामाचे तास 9 वरून 10 तासांपर्यंत केले जातील.
या सुधारणांमुळे उद्योगांना त्यांच्या कामकाजात अधिक लवचिकता मिळेल, तर कामगारांना कायदेशीर अटींनुसार अधिक वेळेसाठी अधिक मोबदला (दुप्पट दराने ओव्हरटाईम वेतन) मिळणार आहे, असा सरकारचा दावा आहे.
उद्योग अनुकूल, कामगार संरक्षित – सुधारित कायदे कसे असतील?
राज्य मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या सुधारणा केंद्र सरकारच्या ‘कृती दला’च्या शिफारशींनुसार केल्या गेल्या. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा या राज्यांनी अशा सुधारणा आधीच केल्या आहेत. महाराष्ट्र आता त्या दिशेने पुढे सरसावला आहे.
कारखाने अधिनियम 1948 – कलम 65 मध्ये सुधारणा:
- कामाचे तास: 9 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढ.
- ओव्हरटाईम मर्यादा: दर तिमाहीत 125 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढ.
- विश्रांती कालावधी (कलम 55): आता प्रत्येक 6 तासांनंतर 30 मिनिटांची विश्रांती (पूर्वी 5 तासांनंतर होती).
- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मध्ये सुधारणा (20 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांसाठी लागू):
- दैनंदिन कामाचे तास: 9 तासांवरून 10 तासांपर्यंत वाढ.
- तातडीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे कामाचे तास: साडे 10 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढ.
कामगारांनाही लाभ?
या निर्णयामुळे फक्त उद्योगधंद्यांना चालना मिळणार नसून, कामगारांनाही अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. आता जास्त काम घेऊनही ओव्हरटाईम न देण्याची प्रथा थांबेल, कारण कायदेशीर सुधारणा झाल्यामुळे प्रत्येक अतिकालिक तासासाठी ठरलेल्या दराने मोबदला देणं बंधनकारक असेल. तसंच, कामाच्या अत्यंत मागणीच्या वेळेत उदा. सणासुदीचा हंगाम, कर्मचारी अनुपलब्धता किंवा अतिरिक्त ऑर्डर्स यावेळी उद्योगांना अधिक वेळ कामकाज चालू ठेवण्याची सोय होईल.
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात उद्योगधंद्यांची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. रोजगाराच्या संधी वाढतील, स्थानिकांना अधिक उत्पन्न मिळेल, तर कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास आवश्यक असलेली लवचिकता प्राप्त होईल.

