(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज (शनिवारी) अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय (बंडू) जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
यापूर्वी 17 जून रोजी या सहाही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन शिंदे गटात विलीनीकरणासाठी अधिकृत पत्र सादर केले होते. त्यानंतर या प्रस्तावावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
दरम्यान, या विलीनीकरणाला विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र पत्र देऊन या प्रस्तावाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, सर्व बाबींचा विचार करून लोकसभा अध्यक्षांनी अखेर सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली.
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून, लोकसभेतील शिंदे गटाचे संख्याबळ अधिक मजबूत झाले आहे. आगामी संसदीय कामकाज तसेच राज्यातील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ९ खासदार विजयी झाले होते. मात्र, त्यापैकी सहा खासदार शिंदे शिवसेनेत अधिकृतपणे विलीन झाल्याने आता ठाकरे गटाकडे केवळ तीन खासदार उरले आहेत. परिणामी, लोकसभेतील ठाकरे गटाचे संख्याबळ लक्षणीयरीत्या घटले असून, शिंदे गटाची ताकद अधिक वाढली आहे.

