(ठाणे)
जिल्ह्यातील भिवंडी शहरात प्रेमविवाहाच्या नात्याचा अंत इतका भीषण होईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. एकीकडे सोशल मीडियावरून सुरू झालेलं प्रेमसंबंध, नंतर एकत्र संसार, एक मुलगा आणि दुसरीकडे परस्पर अविश्वास, संशयाचे सावट आणि सततचे वाद या साऱ्याचा शेवट एका भयावह हत्येत झाला. भिवंडीच्या ईदगाह झोपडपट्टीजवळील खाडीच्या दलदलीत एका महिलेचा धडाविना शीर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा तपास सुरू करताच भिवंडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत एका क्रूर पतीच्या रूपातील खुनीचा पर्दाफाश केला.
मृत महिला परवीन उर्फ मुस्कान अन्सारी (वय २२) आणि आरोपी मोहमंद तहा उर्फ सोनू अन्सारी (वय २५) यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांनी स्वतंत्रपणे एकत्र राहण्यासाठी घरही घेतलं आणि दरम्यान एका मुलालाही जन्म दिला. मात्र कालांतराने दोघांमध्ये सतत वाद सुरु झाले. एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेतले जाऊ लागले. याच वादातून त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. पोलिसांच्या तपासात उघड झाल्याप्रमाणे, दोघे सतत एकमेकांना शिवीगाळ करत भांडत असत, इतकंच नव्हे तर आपल्याच मुलावरही राग काढत असत. अशाच एका वादातून, मुस्कान घरातून निघून गेली होती आणि ती पुन्हा परतल्यावर २९ ऑगस्ट रोजी आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.
पोलिसांना ३० ऑगस्ट रोजी खाडीलगतच्या दलदलीत एका अज्ञात महिलेचा धडविरहित शीर आढळून आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, ईदगाह झोपडपट्टीतील एक महिला काही दिवसांपासून दिसत नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुस्कान या महिलेबाबत चौकशी सुरू केली आणि तिचा पती तहा अन्सारी याला शोधून काढलं. १ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की, वादाच्या तीव्रतेतून संतप्त होऊन त्याने पत्नीचा शिरच्छेद केला आणि मृतदेहाचे दोन तुकडे करून खाडीत फेकून दिले.
पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत आरोपी पतीने शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण अजूनही धड आढळून न आल्याने खाडी लगतच्या पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन शस्त्र व मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रोन, बोट आणि श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहिम राबवली जात आहे. आरोपीने हत्या करताना वापरलेले शस्त्रही खाडीत फेकल्याचं मान्य केलं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्या व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
आरोपीने हत्येची कबुली दिली असली तरी नेमकं हत्या का केली, हे कारण अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाही. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून, त्याचा हेतू व मानसिक स्थिती याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रेमातून सुरू झालेलं नातं अल्पावधीतच संशय, हिंसाचार आणि हत्या अशा क्रूरतेपर्यंत पोहोचल्याने सामाजिक व कौटुंबिक नात्यांमध्ये वाढत चाललेल्या असहिष्णुतेचा आरसा पुन्हा एकदा समाजासमोर उभा राहिला आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याचा भयानक अंत झाला आहे. मात्र, यामध्ये मुलाने आई गमावली आणि बाप जेलमध्ये गेल्याने मुलगा मोहम्मद आता एकटा पडला आहे, सध्या या मुलाला नातेवाईकांनी आपल्यासोबत घेत त्याचा सांभाळ सुरू केला आहे. चिमुकल्या मोहम्मदला पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

