(इस्लामाबाद / वृत्तसंस्था)
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिका–इराण यांच्यातील महत्त्वपूर्ण शांतता चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय संपली आहे. पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत अनेक फेऱ्यांची चर्चा होऊनही दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. परिणामी, मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी सांगितले की, तब्बल 21 तास चाललेल्या चर्चेनंतरही कोणताही करार होऊ शकला नाही. “आम्ही प्रामाणिक हेतूने चर्चेसाठी आलो होतो आणि अंतिम प्रस्तावही दिला होता. मात्र इराणने तो स्वीकारला नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिली होती आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती” असे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यावरून दोन्ही देशांतील मतभेद अद्याप तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
दुसरीकडे, इराणने चर्चेच्या अपयशाचे खापर अमेरिकेवर फोडले आहे. अमेरिकेने अवास्तव आणि एकतर्फी अटी लादल्यामुळेच चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणी शिष्टमंडळाने केला. विशेषतः अणुकार्यक्रम आणि सुरक्षा नियंत्रणाबाबतच्या अटींवरून मोठा वाद निर्माण झाला.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली असून, वाटाघाटींमध्ये प्रगती न झाल्यास सध्याची शस्त्रसंधी मोडण्याचा इशारा दिला आहे. बैठकीतून कोणताही समाधानकारक पर्याय समोर न आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले आहेत. त्यांनी जगाला गंभीर आणि मोठा इशारा दिला आहे. यामुळे आता भरतापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाताना कोणत्याही देशाने इराणला टोल दिला तर आम्ही त्या देशाच्या जहाजाला तिथेच जलसमाधी देऊ, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदीला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर एक पोस्ट करून याविषयी माहिती दिली.
भारतावरील संकटही वाढलं
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इशारा दिला की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची तपासणी केली जाईल. इराणला “बेकायदेशीर टोल” देणाऱ्या जहाजांना रोखण्यात येईल. या निर्णयामुळे इराणवर आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. इराणला कोणीही अवैध टोल दिला तर त्या जहाजाला समुद्रात सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. रम्यान, भारत आणि इराण यांच्यातील संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. या युद्धात इराणने भारताच्या तेलवाहू, नैसर्गिक वायूची वाहतूक करणाऱ्या जहाजांना मार्ग दिलेला आहे. परंतु आता इराणला कोणी टोल दिला तर आम्ही त्या जहाजाला मार्ग देणार नाही, या अमेरिकेच्या भूमिकेमुळे भारताची पंचाईत झाली आहे. त्यामुळे यातून भारत नेमका कसा मार्ग काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्य वादग्रस्त मुद्दे
- युरेनियम संवर्धन बंद: इराणने अणुकार्यक्रम पूर्णपणे थांबवावा, अशी अमेरिकेची मागणी
- युरेनियम साठा बाहेर पाठवणे: सुमारे 900 पाउंड साठा देशाबाहेर हलवण्याची अट
- होर्मुझ नियंत्रण: सामुद्रधुनीवरील सुरक्षा नियंत्रण अमेरिकेकडे असावे, असा प्रस्ताव

