( नवी दिल्ली )
जागतिक पासपोर्ट रँकिंगमध्ये यंदा मोठे बदल पाहायला मिळत असून भारताच्या पासपोर्टची ताकद आणखी वाढली आहे. आशियाई देशांचे वर्चस्व कायम असतानाच सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली ठरला आहे. सिंगापूरच्या नागरिकांना तब्बल 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवासाची परवानगी मिळते. या यादीत जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्तपणे पुढील स्थानावर आहेत.
यंदाच्या पासपोर्ट रँकिंगमध्ये संयुक्त अरब अमिरातीने विशेष कामगिरी करत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या काही वर्षांत युएईच्या पासपोर्टची ताकद सातत्याने वाढताना दिसत आहे.
दरम्यान, भारतासाठीही ही रँकिंग आनंदाची बातमी ठरली आहे. भारताने पाच स्थानांनी सुधारणा करत अल्जेरियासोबत संयुक्तपणे 80वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय पासपोर्टधारकांना आता एकूण 55 देशांमध्ये पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. यामध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश, व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ETA) या सुविधांचा समावेश आहे. मागील वर्षी भारत 85व्या स्थानावर होता.
या अहवालानुसार भारताच्या पासपोर्टची आंतरराष्ट्रीय ताकद हळूहळू वाढत असून येत्या काळात भारतीय नागरिकांसाठी परदेश प्रवास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रवाशांना कोणत्या देशांचा होणार फायदा?
भारताच्या सुधारलेल्या पासपोर्ट रँकिंगचा फायदा आशिया, आफ्रिका, ओशनिया, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये भारतीय प्रवाशांना होणार आहे. व्हिसा-मुक्त देशांमध्ये थायलंड, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स यांचा समावेश आहे. तर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा देणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे.
जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (2026):
- सिंगापूर – 192 देश
- जपान – 188 देश
- दक्षिण कोरिया – 188 देश
- डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड – 186 देश
- ऑस्ट्रिया, बेल्जियम, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे – 185 देश
- हंगेरी, पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, संयुक्त अरब अमिराती – 184 देश
भारताच्या पासपोर्ट रँकिंगमधील ही सुधारणा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची वाढती ओळख आणि प्रवास सुलभतेकडे होत असलेल्या सकारात्मक वाटचालीचे संकेत मानले जात आहेत.

