( पुणे )
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक पुराव्यांनंतर या प्रकरणाला कथित हत्येचे वळण मिळाले आहे. या अटकेनंतर सिया गोयल हिच्या वडिलांना हदयविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित भूमिकेची चौकशी सुरू असतानाच सियाच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी, “माझी मुलगी दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले, तर तिलाही कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भूमिका मांडली. त्याचवेळी त्यांनी असा दावा केला की, सियाचे केतनवर प्रेम होते आणि ती अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाही. त्यांनी हेही सांगितले की, लोहगडावर जाण्याबाबत सियाने सुरुवातीला नकार दिला होता आणि त्यासंदर्भातील चॅटही असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, सियाच्या आईनेही भावनिक प्रतिक्रिया देताना, “केतन हा आमच्यासाठी केवळ होणारा जावई नव्हता, तर मुलासारखा होता. जर माझी मुलगी सिया या गुन्ह्यात दोषी आढळली, तर तिला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. मी एक आई आहे, तरीही आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशीच माझी मागणी आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “केतनने आमच्यावर इतकं प्रेम केलं की, माझा स्वतःचा मुलगा साहिलपेक्षाही त्याने आमची अधिक काळजी घेतली. तो आमच्यासाठी केवळ होणारा जावई नव्हता, तर मुलासारखाच होता. केतनची हत्या नेमकी कोणी केली, हे देवाला माहीत आहे. मात्र, जर या प्रकरणात सिया दोषी ठरली, तर तिलाही कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
तपासात CCTV आणि डिजिटल पुरावे महत्त्वाचे
पोलिसांनी तपासादरम्यान मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, 17 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी पुण्यातील एका कॅफेमध्ये सुमारे एक तास एकत्र होते. तपास यंत्रणांचा संशय आहे की, या भेटीदरम्यान दोघांमध्ये केतन अग्रवालविषयी कट रचण्याबाबत चर्चा झाली असावी. याशिवाय, तपासात सिया गोयलने कथितपणे लोहगड किल्ल्याविषयीचे व्हिडिओ ऑनलाइन शोधल्याचेही समोर आले आहे. पोलिस मोबाईल डेटा, इंटरनेट सर्च हिस्ट्री, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहेत. या सर्व बाबींची न्यायवैद्यक आणि तांत्रिक पडताळणी सुरू आहे.
अपघाताचा दावा, पण तपासात बदलले चित्र
18 जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया गोयल लोहगड किल्ल्यावर गेले होते. सुरुवातीला केतनचा दरीत पडून अपघाती मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. सियानेही पोलिसांना फोटो काढताना तोल जाऊन पडल्याचे सांगितले होते. मात्र, तिच्या जबाबातील कथित विसंगती, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. तपासात किल्ला परिसरातील फुटेजमध्ये हुडी घातलेला एक संशयित युवक दिसून आला. पुढील चौकशीत त्याची ओळख चेतन चौधरी अशी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
प्रेमसंबंध आणि कटाचा पोलिसांचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय असून, केतन अग्रवाल त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. यापूर्वीही केतनला लोहगडावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याविरोधात हत्या आणि कट रचल्याचे गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. डिजिटल पुरावे, डीएनए अहवाल आणि अन्य तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, खूनाच्या दिवशी चेतन चौधरी केतन आणि सिया यांच्यापूर्वीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. किल्ल्यावर प्रवेशासाठी २५ रुपयांचे तिकीट घेणे बंधनकारक असतानाही त्याने तिकीट काढले नव्हते. सुरक्षा रक्षकाने विचारणा केल्यानंतर “व्यायामासाठी वर जात आहे, परत येताना पैसे देतो,” असे सांगून त्याने प्रवेश मिळवला. मात्र, परतताना त्याने शुल्क भरले नसल्याचे तपासात समोर आले आहे. अधिकृत नोंदीत आपले नाव येऊ नये, यासाठी त्याने ही शक्कल लढविल्याचा पोलिसांना संशय आहे.
मोबाइल दुकानात ठेवून दुसरा फोन घेतला
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे चेतनने स्वतःचा मोबाइल इंटरनेटसह बंद करून एका दुकानात ठेवला होता. त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल सोबत घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःचे लोकेशन पोलिसांना मिळू नये, यासाठी हा डाव आखल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. किल्ल्यावर जाताना त्याने चेहरा झाकलेला, हुडी, सॅक, बर्मुडा, स्पोर्ट्स शूज आणि मोठे हेडफोन घालून ट्रेकिंगसाठी आलेल्या व्यक्तीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
CCTV फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावा
१८ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास केतन अग्रवाल आणि त्याची वाग्दत्त वधू सिया गोयल कारने लोहगडकडे रवाना झाले. त्यांच्या हालचालींची माहिती चेतनला आधीच होती. तो त्यांच्या आधी प्रवेशद्वाराजवळ पोहोचून थांबला होता. केतन आणि सिया किल्ल्यावर चढू लागल्यानंतर चेतन त्यांच्या मागोमाग गेला. प्रवेशद्वारावरील CCTV कॅमेऱ्यांमध्ये त्याची स्पष्ट छबी कैद झाली असून, हेच फुटेज पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरले आहे.
निर्जन ठिकाणी ढकलून खून केल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, किल्ल्यावरील निर्जन ठिकाणी संधी साधून सिया आणि चेतन यांनी केतनला दरीत ढकलले. त्या वेळी घटनास्थळी सुरक्षा रक्षक किंवा इतर पर्यटक नसल्याने सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सियाने आरडाओरडा करत केतन दरीत पडल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. त्यानंतर तिने तिची आई पूजा गोयल यांनाही फोन करून घटनेची माहिती दिली.
केतनला नेमका धक्का कोणी दिला?
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सिया वारंवार लोहगडावर जाण्याचा आग्रह धरत होती. ३१ मे आणि १४ जून रोजी दोघे किल्ल्यावर जाऊन आले होते. अखेर १८ जून रोजी तिच्याच आग्रहावरून केतन पुन्हा लोहगडावर गेला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
सध्या या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केतनला दरीत नेमका धक्का कोणी दिला, सिया की चेतन? याचा फॉरेन्सिक तपास सुरू असून, त्याच्या अहवालानंतर या बहुचर्चित हत्या प्रकरणात आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

