(पुणे / वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तसेच ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांचे आज (शनिवारी, १९ जुलै) रोजी पुण्यात वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. आज सकाळी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाने गांधीवादी, समाजवादी आणि परिवर्तनवादी चळवळीतील एक अभ्यासू विचारवंत, संघर्षशील नेता आणि लोकशाही मूल्यांचा कट्टर पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
युक्रांदच्या स्थापनेतून सामाजिक परिवर्तनाचा प्रवास
पुण्यात जन्मलेल्या डॉ. सप्तर्षी यांनी बी.एस्सी. आणि एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने डॉक्टर असतानाही त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले.
१७ नोव्हेंबर १९६७ रोजी सिंहगडावर त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)ची स्थापना करून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचार रुजवण्याचे कार्य सुरू केले. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने त्यांनी बिहारमधील दुष्काळ निवारण मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर १९७२ च्या महाराष्ट्रातील भीषण दुष्काळातही युक्रांदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदतकार्य उभारले.
ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष
डॉ. सप्तर्षी यांनी १९७४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राशिन येथे ‘राशिन कम्युन’ची स्थापना करून सामाजिक समतेचा प्रयोग राबवला. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय (१९८४), डॉ. ग. दा. सप्तर्षी कनिष्ठ महाविद्यालय (१९९८) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय (२००१) या शैक्षणिक संस्थांची स्थापना त्यांच्या पुढाकारातून झाली.
२००६ पासून ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून गांधीवादी विचारांचा प्रसार करत होते.
संघर्षमय राजकीय आणि सामाजिक वाटचाल
१९७८ मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले. आपल्या आयुष्यात विविध सामाजिक आणि लोकहिताच्या आंदोलनांमुळे त्यांना तब्बल ६२ वेळा अटक झाली होती.
कच्छ प्रश्नावरील आंदोलन, पुण्यातील कॉलेज फीवाढविरोधातील लढा, सोलापूर मेडिकल कॉलेजच्या कॅपिटेशन फीविरोधातील आंदोलन, दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीचा संघर्ष, मंदिर प्रवेश चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरू हटाव आंदोलन अशा अनेक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय नेतृत्व केले.
लेखक, संपादक आणि विचारवंत म्हणूनही वेगळी ओळख
डॉ. सप्तर्षी हे प्रगल्भ लेखक आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होते. गेल्या ३१ वर्षांपासून ते ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करत होते. ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’, ‘यात्री’, ‘मोहनदास गांधी’, ‘सत्तातुरनामा’ आणि ‘व्यक्तिरंग’ यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील भारत यात्रेत सहभागी होऊन त्यांनी देशातील सामाजिक वास्तवाचा अभ्यास केला.
अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार, बिहार अस्मिता पुरस्कार, डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच २०२० चा ‘गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड’ यांसह अनेक सन्मान प्राप्त झाले होते.
सोमवारी गांधी भवन येथे अंत्यदर्शन
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवाचे सोमवार, २० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोकशाही मूल्यांसाठी झटणारा अभ्यासू समाजचिंतक, गांधीवादी विचारांचा खंदा पुरस्कर्ता आणि परिवर्तनवादी चळवळीतील एक निष्ठावान लढवय्या गमावला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात कायम स्मरणात राहील.

